श्रीसंत परंपरेचे अनेक आशीर्वाद, परमपूज्य सद्‌गुरु श्री. वामनराव गुळवणी महाराजांचे व श्रीदत्त परंपरेचे शुभ आशीर्वाद अखेर फळास आले. अनेक दानशूर, समाजधुरीण, ज्ञात व अज्ञात बंधू व भगिनी आणि हितैषी सज्जन व अनेक सेवापरायण संस्थांच्या सहकार्याने व परमपूज्य सद्‌गुरु श्री. मामांचे शिष्योत्तम परमपूज्य सद्‌गुरु तीर्थस्वरूप सौ. शकुंतलाताई आगटे व परमपूज्य सद्‌गुरू तीर्थस्वरूप श्री. शिरीषदादा कवडे यांच्या महत्प्रयासाने अखेर आळंदीत एक जागा मिळाली व श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय व श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवनाची स्वतःची वास्तू २०१८ साली उभी राहिली. आज परंपरेतील पुढील अधिकारी विभूती परमपूज्य सद्‌गुरु तीर्थस्वरूप श्री. अनिरुध्दजी आगटे यांच्या कुशल मागदर्शनाखाली श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवनाचे व श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठाचे कार्य जोमाने सुरू आहे. दिनांक १५ ऑक्टोबर १९७३ रोजी पुण्यातील धर्मादाय आयुक्त कचेरीत नोंदणी झालेल्या संस्थेच्या घटनेनुसार संस्थेची मूळ उद्दिष्टे पुढे दिलेली आहेत.

 १) श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थानापासून जवळच सिद्धबेट नावाचा तपोवनाचा परिसर इंद्रायणी नदीचे काठी आहे. सदरहू परिसर ‘‘ पावन तपोवन ’’ म्हणून सुप्रसिध्द आहे. सदरहू तपोवनांतच श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मातापित्यांचे वास्तव्य होते व या पवित्र तपोवन भूमीतच श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानदेव, श्रीसोपानदेव व श्रीमुक्ताबाई यांचा जन्म झाला व बालपण गेले. या तपोवन भूमीपैकी इंद्रायणी सिद्धबेट परिसरातील सुमारे १०० एकर जमीन संपादन करणे व उद्देश (खालील) पोट कलम २ ते १० मध्ये लिहिलेल्या कामासाठी एक राष्ट्रीय स्मारक म्हणून तेथे तपोवन निर्माण करणे.

 २) श्रीज्ञानदेवांच्या अध्यात्म व तत्वज्ञानाचा शांत व पवित्र तपोवनाच्या वातावरणात अभ्यास, मनन व चिंतन व्हावे, अधिकारी थोर व्यक्तींच्या सान्निध्यात व त्यांचे मार्गदर्शनाखाली सर्व थरातील साधकांना त्यांच्या भूमिकेवरून व अवस्थेतून प्रगती व्हावी, अशी साधना करता यावी. नीति, सदाचार, प्रेम, बंधुभाव व मानवतेची जीवनातील मूल्ये व चारित्र्य यांची वाढ व्हावी, त्या कामी प्रेरणा व शक्ती मिळावी व त्याचा समाज जीवनावर प्रभाव पडावा.

 ३) सर्व संत वाङ्गमयाचा सखोल, तौलनिक अभ्यास व्हावा. त्यांच्या तत्वज्ञानाची शिकवण, जीवन कसे उन्नत करू शकेल, याचे चिंतन व मनन व्हावे व त्याकरिता संशोधन करणे.

 ४) समाज-जीवनावर प्रभाव पाडू शकतील, असे चारित्र्यवान, ध्येयनिष्ठ व तळमळीचे लोकसेवक व धर्म प्रचारक तयार करून त्यांच्या द्वारा मानव जातीची अभ्युदय व निःश्रेयस यांचेकडे वाटचाल व्हावी.

 ५) निरनिराळया विद्यापीठांतून अध्यात्म विषयांस प्राधान्य मिळवून देऊन त्याच्या शिक्षणाची व अभ्यासाची सोय व्हावी, अखिल भारतीय विद्यापीठात संत वाङ्गमयाच्या अभ्यासास अग्रक्रम प्राप्त व्हावा व विज्ञाना बरोबरच अध्यात्मानेच समाज जीवन सफल व समृद्ध होणार आहे, याबद्दलचा प्रचार करावा.

 ६) महाराष्ट्रातील विद्यापीठांत श्रीज्ञानेश्वरी व महाराष्ट्रीय संत वाङ्गमयाचा सर्व बाजूंनी पध्दतशीर, खोल अभ्यास व्हावा व त्यासाठी विद्यापीठाकडून अध्यासने राखून ठेवण्याची व्यवस्था व्हावी.

 ७) श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्गमयाचा, तत्वज्ञानाचा व तत्संबंधी सर्व जरूर व पोषक अशा पौर्वात्य व पाश्चिमात्य ग्रंथांचा संग्रह करणे व त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करणे.

 ८) संतवाङ्गमयावर व ज्ञानेश्वरीवर अनेक महत्वाची भाषणे, प्रवचने, कीर्तने होतात. त्यांच्या ध्वनिमुद्रिका व टेप्स्‌ यांचा संग्रह करून त्यांचे संगोपन करणे.

९) भागवत धर्म व सर्व संप्रदाय व वारकरी शिक्षण यांच्या उच्च आदर्शाला व वैचारिक बैठकीला पोषक व योग्य असे नामसप्ताह, कीर्तने, प्रवचने, अभ्यास मंडळे, परिसंवाद, भक्ति, ज्ञान, वैराग्य यांना पोषक संमेलने भरविणे वगैरे कार्यक्रम करणे.

१०) सदरहू ध्येय व उद्देश यांना पोषक व त्यांच्या वाढीसाठी जे जे योग्य असे करावे लागेल, ते ते सर्व करणे.

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

Slider